भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर
अनेक ठिकाणी पिके आडवी ; कापसाच्या झाल्या वाती
केदारखेडा परिसरात गारांचा पाऊस
भोकरदन : भोकरदन शहर आणि तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे व जोरदार पावसाने अनेक ठिकाणी चाऱ्याचे आणि कापसाचे मोठे नुकसान केले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीच करता आले नाही. सध्याच्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
रविवारी रात्री वादळी वरात जोरदार पाऊस झाला तर सोमवारी देखील ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू होता. त्यामुळे शेती पिकांवर मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान, राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
७ ते १० जानेवारीदरम्यान राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, ९ जानेवारीला काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रबी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे. रविवारी आणि सोमवारी अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडला. यामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे मात्र यामुळे शेतकऱ्यांचा तूर काढणीच्या हंगामाला नुकसान पोहचू शकतं असा अंदाज लावण्यात येत आहे.
दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गेल्यावर्षी नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान दुष्काळी परिस्थितीमुळे भोकरदन तालुक्यात रब्बीची पेरणी अल्प झाली आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाने रब्बी ऐवजी खरिपाचीच शेतात राहिलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने कापूस तसाच होता त्यामुळे अवकाळीने काही ठिकाणी कापसाच्या वाती झाल्याचे दिसून आले. बहुतेक ठिकाणी मका पिकाची सोंगणी झाली असून काही ठिकाणी मका शेतातच पडून आहे याशिवाय चारा देखील जमा करणे बाकी असल्याने अशा शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने चाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा टाकणार आहे.
: भोकरदन तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील मका पीक आडवे झाले आहे. भायडी येथील कृष्णा जंजाळ यांच्या शेतातील चार एकर मकाचे पीक आडवे झाले तर या परिसरात इतर शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे पायाला मिळाले. दरम्यान केदारखेडा परिसरातील जवखेडा ठोंबरे व आदी भागात तुरळक गारांचा पाऊस झाल्याचे त्या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. या गारांच्या पावसामुळे ज्वारीचे पीक आडवे पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान काही ठिकाणी जोरदार हवेमुळे घरावरील पत्रे उडाली आणि पावसाचा बचावासाठी लावलेली ताडपत्री देखील उडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
: कापसाच्या झाल्या वाती
भोकरदन तालुक्यातील तळणी शिवारात झालेल्या जोरदार पावसाने कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. माझ्या शेतातील तीन-चार एकर मधील कपाशी पिकाची झाली होती. मात्र अजून तीन-चार एकर शेतामधील कपाशीची मजुराऐवजी वेचणी रखडली होती.
रविवारच्या पावसाने फुटलेला कापूस पूर्ण ओला झाला. यामध्ये माझे ३० ते ४० हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
– रामचंद्र गायके, शेतकरी तळणी