पावसामुळे बंद झालेले टँकर सुरू अवकाळी मुळे सहा दिवसांपासून बंद होते टँकर


शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

भोकरदन : भोकरदन शहराला पाणीपुरवठा करणारे जुई धरण कोरडे पडल्याने शहरात २५ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान सहा दिवसांपासून अवकाळी पावसामुळे बंद झालेले टँकर रविवारी सातव्या दिवशी पासून रस्ता कोरडा झाल्यामुळे सुरू झाले आहे. शहरात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्व पदावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मागच्या रविवारपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे टॅंकर जाणाऱ्या रस्त्यावर चिखल झाल्याने गेल्या सहा दिवसांपासून भोकरदन शहराला पाणीपुरवठा करणारे टॅंकर बंद झाले होते. त्यामुळे शहरातील विविध भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेअर वासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली आहे.
भोकरदन शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शेलूद येथील धामना धरणावरून २५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला बानेगाव येथील धरणातून टँकर सुरू केले, मात्र नागरिकांच्या विरोधामुळे ते रद्द करण्यात आले.
त्यानंतर धामना धरणावरून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच, गेल्या रविवारपासून सलग चार दिवस अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे हिसोडा ते टँकर भरण्यासाठी काढण्यात आलेल्या पॉईंटपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. या ठिकाणी टँकर जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने मागच्या सहा दिवसांपासून टँकर जागेवरच उभे राहिले होते ते रविवार ( ता.३) पासून सुरळीत सुरू झाले आहे.
सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे नाल्यांना पाणी आले आहे. जुई नदीला पूर आला, मात्र हे पाणी धरणापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे पाऊस पडून ही धरणात एक थेंब पाणी आले नाही. परिणामी, शहरातील नागरिकांना ऐन हिवाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Advertisement

: आज पासून टँकर सुरू
शहरासाठी २५ टँकर सुरू होते, नागरिकांना १० ते १५ दिवसांआड पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या मार्गावर असतानाच अचानक अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे टँकरला जाण्यासाठीच्या रस्त्यावर चिखल झाला. त्यामुळे पॉईंटपर्यंत टैंकर जात नाही, मागच्या सहा  दिवसांपासून टॅंकर बंद होते ते रविवार पासून सुरु झाले आहेत.
दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे टँकर बंद झाल्याचा प्रकार घडला आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. नगरपालिका प्रशासन मात्र शहराला सुरळीत पाणीपुरवठा यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे

– अजय व्यवहारे,
कनिष्ठ अभियंता, न.प. भोकरदन


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »