भोकरदन शहरासाठी नवीन १७७ घरकुलांना मंजुरी
तहसीलदार तथा मुख्याधिकारी संतोष बनकर यांनी दिली माहीती
भोकरदन : पंतप्रधान घरकुल याेजनेअंतर्गत भोकरदन नगरपरिषदेला २०२३-२४ या नवीन वर्षात घरकुलांचे ५७३ पैकी १७७ नवीन प्रस्ताव मंजूर झाले आहेत. संबंधित लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे पूर्ण करून बांधकाम सुरू करावे, असे आवाहन तहसीलदार तथा नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष बनकर यांनी केले आहे.
भोकरदन नगरपरिषद कार्यालयात गुरुवारी (दि.३०) मुख्याधिकारी संतोष बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयीन अधीक्षक नामदेव गाडेकर, अभियंता अजय व्यवहारे, लेखापाल विश्वजित गवते यांनी यादी जाहीर केली.
दरम्यान मुख्यधिकारी संतोष बनकर म्हणाले की, पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत भोकरदन शहरातील गरीब कुटुंबाना साधरणतः १ हजार ४६ घरकुले आतापर्यंत मंजूर झाली होती. त्यापैकी २८५ लाभार्थ्यांना वेळोवेळी सूचना देऊन त्यांनी काम सुरुच न केल्याने रद्द करण्यात आले. या योजनेमध्ये केंद्र शासन लाभधारकांना निम्मी रक्कम देते. तर राज्यशासनाचाही निम्मा वाटा या योजनेसाठी दिला जातो. या योजनेमुळे गरजू व गरीब घटकातील कुटुंबांची घरे उभी राहत आहेत. मागील घरकुलाचा पहिला, दुसरा हप्ता लाभधारकांना देण्यात आला आहे. उर्वरित रक्कमसुध्दा नगरपरिषदेच्या वतीने लवकरच देण्यात येणार आहे.
पंतप्रधान आवास घरकुल योजनेअंतर्गत ५७३ लोकांच्या चौथ्या डीपीआरमधील १७७ लोकांचा पहिला टप्पा मंजूर करण्यात आला आहे.
या नवीन लाभार्थ्यांनी घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी भोकरदन नगरपरिषदेने साधारणतः ५७३ प्रस्ताव पाठविले होते. यामध्ये १७७ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असुन यादी नगरपरिषद कार्यालयात जाहीर करण्यात आली. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून साधारण अडीच लाख रुपये मिळतात. नवीन मंजूर झालेल्या सर्व लाभधारकांनी भोकरदन नगरपरिषदेकडून आपला अधिकृत बांधकाम परवाना काढून व कायदेशीररित्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार तथा प्रभारी न.प.चे मुख्याधिकारी संतोष बनकर यांनी केले आहे. यावेळी बजरंग घुळेकर, दामोदर तायडे, अंबादास इंगळे, समी बेग, अजीम शेख, अरेफ भाई, सोमीनाथ बिरारे, कैलास जाधव, गणेश बैरागी, मनीषा नरवाडे, अक्षय पगारे, गोवर्धन सोनवणे आदींची उपस्थिती होती.