भोकरदन तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने सलाईनवर
डॉक्टर, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त : १ लाख १५ हजार पशुधनाचे भवितव्य धोक्यात
भोकरदन – विजय सोनवणे : तालुक्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांतील डॉक्टर, पशुधन पर्यवेक्षक यांसह कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवा सलाईनवर असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अन्वा, जळगाव सपकाळ, वरूड, येथे पशुधन पर्यवेक्षकांची पदे भरलेली आहे तर पारध येथे पशुधन पर्यवेक्षकाचे पद रिक्त असून पंचायत समितीचे अखत्यारीतील पशुधन विकास अधिकारी हे पद रिक्त आहे. नळणी, हसनाबाद, पिंपळगाव कोलते येथे पद भरलेले आहे तर चांदई टेपली आणि जवखेडा येथे पशुधन पर्यवेक्षकाचे पद रिक्त आहे.
राज्य शासनाच्या भोकरदन येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सहाय्यक पशुधन उपायुक्ताचे पद रिक्त आहे. सिपोरा बाजार येथील पशुधन पर्यवेक्षकासह दानापूर, वालसावंगी, धावडा, आव्हाना आणि केदारखेडा येथील पशुधन पर्यवेक्षकाचे मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील पशु दवाखाने वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे.
भोकरदन तालुक्यात जिल्हा परिषद अंतर्गत नऊ
तर राज्य शासनाच्या अंतर्गत सात वैद्यकीय दवाखान्यात आहेत.
दरम्यान २० व्या पशुजनगनेनुसार गाय वर्ग, म्हैस, शेळी आणि मेंढी वर्ग १, लाख १५, हजार ३७४ जनावरे असून त्यांच्यावर उपचार करताना कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. त्यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.
भोकरदन हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता; परंतु येथे इकडच्या काळात नदी काठावरील बंधाऱ्यांमुळे पाण्याची उपलब्धता राहते, या पाण्यामुळे तालुक्याला वैभव प्राप्त झाले आहे. हरितक्रांती झाल्याने येथील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायाकडे वळले आहेत. सध्या तालुक्यात एकूण १ लाख १५ हजार ३७४ पशुधन आहे. तसेच शेळ्या, मेंढ्या व कोंबड्यांची संख्या देखील मोठी आहे. असे असताना तालुक्यातील एकूण जिल्हा परिषद अंतर्गत व राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या पशुवैद्यकीय
दवाखान्यांत मोठ्या प्रमाणात पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची संख्या अपुरी आहे. काही मोजकेच कर्मचाऱ्यांवर पशुवैद्यकीय दवाखान्यांचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे पशुधनाची हेळसांड होत आहे.
: भोकरदन येथील सहाय्यक पशुधन उपायुक्त असे हे मोठेपद रिक्त असून दुसऱ्याकडे पदभार आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांत कायमस्वरूपी डॉक्टर नाहीत. तात्पुरती अकरा महिन्यांकरिता डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांची मुदत संपल्यानंतर त्यांना देखील २७ नोव्हेंबर पासून कार्यमुक्त करण्यात आले आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर्सची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.