शहरात वर्ल्डकप फायनलचा फीवर
क्रिकेट प्रेमींमध्ये उत्कंठा : अमृतभाऊ देशमुख यांनी पेट्रोल पंपावर मोठा स्क्रीन दिला उपलब्ध करून
भोकरदन : एक तपानंतर भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम लढतीसाठी पात्र ठरला आहे. भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकून भारतीयांना दिवाळी गिफ्ट द्यावे, अशी तमाम क्रिकेट शौकिनांची इच्छा होती. याच भावनेतून भोकरदनमध्ये आणि तालुक्यात गल्लोगल्ली क्रिकेटच्याच गप्पा असून, रविवारी (दि. १९) भोकरदन शहरातील उद्योगपती अमृतभाऊ देशमुख यांनी त्यांच्या किरण पी पेट्रोल पंपावर मोठा स्क्रीन उपलब्ध करून क्रिकेट प्रेमींचा आनंद द्विगुणित केला. भोकरदनकरांनी सामन्याचा आनंद घेतल्याचे दिसून आले. भोकरदनच्या क्रिकेट शौकिनांमध्ये अंतिम सामन्याचा फीवर दिसून आला आहे. सामन्याचा आनंद घेण्यासाठी अनेक चित्रपटगृहे आणि मोठ्या हॉटेल्समध्ये अंतिम सामन्याचे स्क्रीनिंग केले जाणार असल्याने त्या ठिकाणी तरुण वर्ग सकाळपासून जाण्याचे तयारीत होता. २० वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय वर्ल्ड कपमध्येभारताचा पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारताला मिळाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकात कमालीचा फॉर्मात असून, या संघाने साखळीतील एकही सामना गमावलेला नाही. उपांत्य सामन्यात न्युझीलंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. महेंद्रसिंग धोनींच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये भारताने वर्ल्ड क्रिकेट कप जिंकला होता. त्यानंतर यावर्षी भारताला विश्वचषक उंचावण्याची संधी प्राप्त झाली आहे. देशभरासह भोकरदन तालुक्यातील क्रिकेटप्रेमीही अंतिम सामन्यासाठी उत्सुक होते. भोकरदन मध्ये अनेक ठिकाणी या सामन्याची सकाळपासूनच तयारी सुरू झाली होती. अनेकांनी चौकांमध्ये स्क्रीन्स लावून क्रिकेट लढतीचा आनंद घेण्याचा चंग बांधला होता.