जुई धरणातील गाळ उपशासाठी शासनाने मदत करावी
‘लोकजागरचे’ केशव पाटील जंजाळ यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे जुई धरण सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पूर्णतः कोरडे झाले आहे. अशा परिस्थितीत धरणातील गाळ काढण्यात आला तर भविष्यातील पाणीटंचाई दूर होणार आहे. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे धरणातील गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाने मदत केली तर शेतकऱ्यांना देखील पुढच्या हंगामात अधिक उत्पन्न होईल यासाठी शासनाने दुष्काळी परिस्थिती व शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भावनेने तातडीने पोकलँड किंवा आर्थिक मदत द्यावी अशी मागणी लोकजागर संघटनेचे केशव पाटील जंजाळ यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
भोकरदन तालुक्यातील जुई धरणात तत्कालीन जिल्हा जिल्हाधिकारी यांच्या काळात सन २०१२ – २०१३ आणि त्यानंतर सन २०१७ – २०१८ मध्ये जुई प्रकल्पातील गाळ उपसा मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली होती. या मोहिमेला शासनाने देखील भरी मदत केल्याने त्याकाळी या धरणातून जवळपासच्या शेतकऱ्यांनी ७० हजार ब्रास गाळ उपसा केला होता आणि त्यांच्या शेतात टाकला होता. त्या काळात गाळ टाकलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीमधील उत्पन्न वाढले असून ७० हजार ब्रास गाळ काढल्यामुळे तेवढा पाणीसाठा देखील काही वर्षात साठवला गेला होता. त्यामुळे यावर्षी धरण पूर्णतः कोरडे झाल्यामुळे गाळ उपसण्यासाठी मोठी संधी आहे. तेव्हा शासनाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना गाळ उपसासाठी तातडीने मदत करून शासकीय गाळ उपसा मोहीम राबवावी अशी मागणी देखील या निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान केशव पाटील जंजाळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने गाळ उपसा मोहीम राबवण्यासाठी शासन स्तरावर १५ पोकलेन उपलब्ध करून द्यावे व शेतकऱ्यांना गाळ वाहतूक करण्यासाठी वाहतूक खर्च द्यावा. यासाठी जिल्हाधिकारी यांनी एक समिती गठीत करून त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश करा करावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
महत्त्वाचे म्हणजे जुई धरण ते मुख्य रस्त्यापर्यंत चांगला दुतर्फी रस्ता तयार करून धरणातील भिंतीला तडे याची दुरुस्ती करण्यात यावी व धरणाची उंची वाढवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात यावे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
: मोहिमेमध्ये आम्ही सलग दोन वर्ष पुढाकार घेऊन हे अभियान राबविले असून याही वेळेस लोकजागर अभियानाच्या वतीने पुढाकार घेत आहोत. जास्तीत जास्त गाळ उपसा मोहीम राबवली जावी यासाठी शेतकऱ्यांची शेती समृद्ध करण्याचा मानस आमच्या लोकजागरच्या वतीने आम्ही करणार आहोत. सरकारने व प्रशासनाने याकडे लक्ष देवून मदत करावी व संपूर्ण गाळ उपसा मोहीम राबविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.
– केशव पाटील जंजाळ , लोकजागर संघटना – संस्थापक अध्यक्ष